सिल्लोड तालुक्यातील १५ गावांना पाणीटंचाईच्या झळा

Foto
चारनेर - पेंडगाव प्रकल्पातील पातळी घटली; नागरिकांत चिंता

सिल्लोड, (प्रतिनिधी): तालुक्यातील चारनेर-पेडगाव धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असतानाच, धरणातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे पाणी उपसा सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
या अनधिकृत उपशामुळे भविष्यात परिसरातील १० ते १५ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याची दखल घेत स्थानिक ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव मंजूर करून अनधिकृत उपसा तत्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात तहसीलदार, पाटबंधारे विभाग आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदने देण्यात आली आहेत.  मात्र, अद्यापही काही शेतकऱ्यांकडून अवैध उपसा सुरूच आहे. पंचायत समिती या धरणातून घाटनांद्रा, चारनेर, वाडी, पेंडगाव, देऊळगाव बाजार व आमठाणा या गावांची तहान भागवली जाते. पातळी खालावली असताना काही व्यक्तींकडून होत असलेला अवैध उपसा गंभीर आहे. 

सदस्य रघुनाथ पाटील व ग्रामपंचायत अधिकारी बन्सीधर पडोळकर यांनी सांगितले, की धरणातील पाणीसाठा कमालीचा घटला असून उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने होणे गरजेचे आहे. प्रशासनाने धरण क्षेत्राची पाहणी करून पाणी पिण्यासाठी सुरक्षित ठेवावे, अशी मागणी होत आहे.

पाटबंधारे विभाग प्रकल्पावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सध्या धरणातील पाणी मृतसाठ्यात आहे. आम्ही 'एमएसईबी' ला पत्रव्यवहार केला असून, धरण परिसरात मोटारी, जनरेटर किंवा पाणी उपसा करणारी साधने आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई होईल.
- प्रतीक राठोड, अभियंता, पाटबंधारे विभाग